“नाही नाही म्हणता...”
विस्फारलेले आभाळ सारे,भेगाळलेली धरणी,
मनात सतत बोचणा-या,रक्ताळलेल्या आठवणी,
सुसाटलेल्या वादळाचे वारे सुटले भन्नाट,
रस्ता आहे दिसत नाही,धुके दाटले घनदाट.
कुठुनतरी बिंबाने नजर टाकली हळुवार,
धुके फाटले पिंजलेले अन दिसु लागली वहिवाट,
दिसत नव्हते आजवर,ते दिसू लागले आता,
आनंदी जग समोर प्रगटले,नाही नाही म्हणता...
प्रत्येक क्षण जगतो आता,आनंदाने गातो,
उगीच कधी कातरवेळी, माझ्यात मीच रमतो,
आयुष्य सारे क्षणात एका मिटले आहे आता,
क्षणात सारे पलटून गेले, नाही नाही म्हणता...
वाट माझी फुलून गेली,दिवस हा उजाडला,
हळुहळु कळू लागले,काय चमत्कार घडला,
कुठेतरी गुंतून गेले मन वेडे माझे आता,
खरे सांगतो प्रेमात पडलो,नाही नाही म्हणता...
No comments:
Post a Comment